शिथिलता

 क्रियाकलापाचं (activity) स्वरूप, त्याचे छुपे प्रवाह समजून घेतल्याशिवाय शिथिल होणं, तणावमुक्त होणं शक्य नाही. तुम्हाला शिथिल व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या क्रियाकलापाचं निरीक्षण करायला हवं, तो समजून घ्यायला हवा, कारण क्रियांचा हा गुच्छ म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे.

दोन शब्द:  कृती (action) आणि क्रियाकलाप (activity). action म्हणजे activity नव्हे. दोहोंचं स्वरूप पूर्णतः भिन्न आहे. कृती ही परिस्थितीच्या अनुषंगाने घडते, परिस्थितीला स्वाभाविक प्रतिसाद दिला जातो, बस्स. क्रियाकलाप हा प्रतिसाद नसतो, तुम्ही कृतीशील राहण्यासाठी तडफडता, अतिशय बेचैन असता.

अनेक लोकांना मोकळं व्हायचं असतं पण ते शिथिल होऊ शकत नाहीत. शिथिल होणं फुलण्यासारखं आहे,  जबरदस्तीने घडवून आणता येणार नाही. बारकाईने लक्षात घ्या - तुम्ही क्रियाकलापात इतके मग्न का? इतका प्रचंड अट्टहास कशाकरता?

क्रिया ही शांत, स्वस्थ मनातून उमटते. क्रियाकलाप हा अस्वस्थ मनाचा उद्रेक असतो. तुम्ही क्रिया (act) करा, कृती करा, त्यातून क्रियाकलाप (activity) आपोआप घडू दे.

शिथिल होणं, निवांत असणं म्हणजे क्रियाकलापाची आस न उरणं. शिथिलता म्हणजे मेल्यागत पडून राहणं नव्हे. तसं पडून रहाणं शक्यही नाही, कारण आपण जिवंत आहोत. जेव्हा क्रियाकलापाचा हट्ट उरत नाही तेव्हा तुम्ही शिथिल होऊ शकता; तुमची ऊर्जा तुमच्याचपाशी राहते, तिचा क्षय होत नाही. परिस्थितीअनुसार तुम्ही कृती कराल इतकंच. तुमचं मन कृतीशील राहण्याकरता धडपडणार नाही. तुम्ही स्वत:सोबत गुण्यागोविंदाने रहाल. स्वत:सोबत आरामात जगणं म्हणजे शिथिलीकरण.

शिथिलीकरण हे केवळ शरीराचं वा मनाचं नसतं, ते संपूर्ण अस्तित्वाचं असतं. तुम्ही सतत थकलेले, सैरभैर झालेले, आतून सुकलेले, गोठलेले असाल तुमच्यातली जीवनऊर्जा सहजप्रवाही राहणार नाही. जीवन म्हणजे अडथळ्यांची मालिका वाटेल. मग ताण येईल, व ताणमुक्त होण्याची गरज भासेल.
जोपर्यंत तुम्ही आतल्या गोंधळाचं, क्रियाकलापाने गच्च झालेल्या आयुष्याचं सखोल निरीक्षण करत नाही, त्याला स्पर्श करत नाही तोवर तुम्ही स्वत:ला पूर्णपणे सैल सोडू शकत नाही. 
तुमचा क्रियाकलाप समजून घ्या आणि अचानक तो सुरू असतानाच तुम्हाला काहीतरी जाणवेल, त्यात काहीतरी थांबेल.

शिथिलता, निवांतता म्हणजे 'हा क्षण पुरे आहे, गरजेपेक्षा जास्त आहे, अपेक्षेहून अधिक आहे, ' ही जाणीव.

- रजनीश (ओशो)
 
 



Comments