मन
मन म्हणजे भीती. मन फार भित्रं आहे. त्याला कायम सुरक्षिततेची, शाश्वतीची चिंता लागून असते. मात्र प्रेमाचं, ध्यानाचं जग म्हणजे शुद्ध असुरक्षितता; हातात कोणताही नकाशा न ठेवता ते तुम्हाला अज्ञाताकडे घेऊन जातं. आपण कुठे निघालोत ते समजत नाही, नक्की कुठे पहोचणार तेही ठावूक नसतं. संभ्रमही नाही आणि निश्चितीही नाही, ही माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर
अवस्था आहे. या क्षणात माणूस एक आरसा होऊन जातो. त्यात उमटणाऱ्या
प्रतिबिंबाला दिशा नसते, उद्देश्य नसतं. काहीही करण्याची कल्पना नसते,
भविष्य नसतं. ते केवळ त्या क्षणात असतं.
मन स्वभावतःच चिंतामय आहे. ‘आपण कुठे निघालोत, काय शोधतोय' असले गंमतीदार प्रश्न त्याला पडतात. मानवी मनाला सतत भरकटण्याची धास्ती वाटते. काळज्या करण्याची वृत्तीच आहे त्याची. पण 'आपल्याला पाच बोटं आहेत' हे एकदा स्वीकारलं की 'पाचच बोटं का', हा प्रश्न रोज पडत नाही.
विद्यापीठातल्या आमच्या एका प्राध्यापक महाशयांच्या हाताला सहा बोटं होती. ते कायम सहावं बोट लपवायचे. मी त्यांना सहा बोटंवाल्या हातानेच धरता येईल असा एक विशिष्ट कागद द्यायचो. वर्गात हशा पिकायचा. कागदावर लिहिलेलं असायचं : ' हे फक्त तुमचं सहावं बोट सर्वांना दिसावं म्हणून.'
त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून विचारलं, "हे काय चालंवलंयस तू!?"
मी म्हणालो, "तुम्ही तुमचं सहावं बोट लपवता. व्याख्यान देताना तुम्ही हात सारावेळ खिशात कोंबता. एकदाच तुमचं ते असाधारण बोट सर्वांना दाखवून टाका. हवंतर कोणाला त्यावर काही आक्षेप आहे का ते विचारा! विषय संपून जाईल. काळजी कशाला?"
तुम्ही कोणत्याही अवस्थेत असा, मन कायम प्रश्नांच्या फैरी झाडेल: 'हे सत्य आहे की कल्पना? वास्तव आहे की स्वप्न? हा प्रत्यक्ष अनुभव आहे की मला भास होतोय?' एकदाच, कायमचं सांगून टाका मनाला: ' तुझा याच्याशी संबंध नाही. मी तुझ्याकडे लक्ष देणार नाही. मी माझ्या कल्पनेत, भ्रम, स्वप्न – जे काही असेल त्यात पूर्णपणे उपस्थित असणार आहे. कृपया त्यात व्यत्यय आणू नकोस.’
सुख हे वास्तव आहे, ते काही उद्दिष्ट नाही. तुम्ही आत्ता ज्या क्षणात आहात, त्याच क्षणातून पुढचा क्षण जन्म घेतो. भविष्यकाळ काही आकाशातून पडत नाही. तो तुमच्यातच पालवत असतो. तुम्ही मनाचं ऐकत बसता, ते प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत राहतं.
मनाला तुमची शांती हिरावू देऊ नका. एखाद्या गोष्टीपासून तुम्हाला सुख मिळत असेल, तर ती या न त्या रितीने वास्तविक असलीच पाहिजे. मिथ्या गोष्टींतून सुख मिळत नाही. मनापासून तुम्हाला कसलीही बहुमोल दोणगी लाभणार नाही. त्याचं ऐकणं थांबवा.
मन तुम्हाला क्षणभरही स्वस्थ बसू देत नाही, सारखं ढोसत रहातं, 'अरे! आकाशाकडे पहात नुसता बसून काय रहिलास? एवढ्या वेळात काही कामं उरकता आली असती, चार पैसे जास्त कमावता आले असते. निदान वर्तमानपत्र वाचता आलं असतं. वाया घालवलीस ना एक सकाळ..' वगैरे.
मनाचे सल्ले ऐकून कोणालाही सत्याची प्राप्ती झालेली नाही. ज्यांना सत्यप्राप्ती झाली ते मनापलीकडे गेले, त्यांनी मनाला बाजूला सारलं.
मनाला कायम बाजूला ठेवत राहा. हळूहळू मन लुडबुडणं सोडून देईल. ते म्हणेल, 'हा / ही गेली कामातून. माझा सूज्ञ सल्ला ऐकत नाही.' मन तुम्हाला त्रास देणं थांबवेल त्या क्षणी तुम्ही पूर्वी कधीच नसाल इतके शहाणे, निरोगी व्हाल. प्रथमच तुम्ही खऱ्या अर्थाने जन्म घ्याल; विचाराच्या, भीतीच्या तुरुंगातून मुक्त व्हाल.
मनाची हालचाल नसते तेव्हा भविष्यकाळही नसतो. भविष्यासाठी आखलेले बेत नसतात. अशावेळी आला क्षणच तुमचं सर्वस्व असतो; या क्षणात तुमचं सकळ अस्तित्व सामावलेलं असतं. अस्तित्व क्षणाशी एकरूप होऊ लागतं, क्षण विलक्षण होऊन जातो. त्याला खोली लाभते, उंची लाभते, गूढता, उत्कटता लाभते. हा भंगुर क्षण तुमची पकड घेतो, तुमचा कायापालट घडवतो.
तुम्ही म्हणजे मन नाही - अंहं, मनाची प्रकाशमय बाजू नाही नि अंधारी बाजूदेखील नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीच्या सुंदर भागाशी तादात्म्य पावत असाल, तर त्या गोष्टीच्या कुरूप भागापासून स्वत:ला दूर ठेवणं अशक्य आहे. तुम्हाला ती गोष्ट एकतर पूर्णांशाने मिळेल वा पूर्णतः सोडून द्यावी लागेल. मानवाला ग्रासणाऱ्या चिंतांचं मूळ हेच, की त्याला सुंदर, तेजस्वी तेवढं वेचायचं असतं. घाणेरडी, काळीकुट्ट बाजू नकोशी वाटते. समस्त संकट निवड करण्यातून उभी राहतात. मन आहे, त्याला उजळ व अंधारी अशा दोन्ही बाजू असतात - मग काय झालं? काय फरक पडतो? तुम्हाला त्याची चिंता का वाटावी?
ज्याक्षणाी तुम्ही निवड करणं थांबवता, त्याक्षणी चिंता नाहीशी होते. एक उदात्त स्वीकार निर्माण होतो. तो सांगतो की मन असंच असणार, तो त्याचा स्वभाव आहे - आणि ती काही तुमची समस्या नाही, कारण तुम्ही म्हणजे मन नव्हे. मनाशी तादात्म होण्यातूनच त्याला जोर चढत असतो. तुम्ही जसजसे तटस्थ होत जाता तसतसा मनाचा थयथयाट, त्याचं वर्चस्व गाजवणं कमी होत जातं.
- रजनीश (ओशो)
Comments
Post a Comment