प्रेमाचा नाच, भक्तीचं गूढ

ज्यांना आपण ‘गूढवादी’ (mystic) म्हणतो अशा व्यक्तींची चरित्रं पाहाल, तर त्यांत पुरेपूर वैविध्य, वैचित्र्य आढळेल. कोणी नजरेसमोर आले तरी पत्ताच लागू नये इतके सर्वसामान्य दिसतात, कळकट-मळकट रहातात. तर कोणी इतके तेजःपुंज, की वाटेवरल्या आंधळ्याचाही आत्मा क्षणिक उजळून जावा! 
अंतर्बाह्य शहाण्या व्यक्तींच्या जगण्या-वागण्याचा कोणताही ठराविक ढंग नसतो, निश्चित चाकोरी नसते. कुणीही इतरांचं अनुकरण करत नाही; आदर्शांचा कित्ता गिरवत नाही.
 
‘गूढवादी’ म्हणून ओळखली जाणारी मंडळी ईश्वराचं रूप दोन प्रकारे कल्पतात: सूफीपंथीय ईश्वराला प्रेयसी मानतात. त्यांच्यालेखी ती स्त्री असते. जगात ही एकमेव स्त्री असते, व सारीच माणसं ‘ति’चे ‘तो’ असतात. भारतातील गूढवाद्यांत ईश्वर हा प्रियकर असतो. जगात हा एकमेव पुरुष असतो, व बाकी सारे ‘त्या’च्या ‘ती’ असतात. 


...मीरा बावरी नाचत-गात मथुरेस पहोचली - कृष्णाच्या भव्य, प्रासादतुल्य मंदिरापाशी. त्याकाळी या कृष्णमंदिरात स्त्रियांना प्रवेश नव्हता! …कृष्णाच्या मंदिरात स्त्रियांना बंदी?? किती हा मूर्खपणा! पण आपल्यापैकी बहुतेकजण निरर्थक रुढींचं, फडतूस नीतिनियमांचं पालन करण्याला 'धार्मिकता' मानतात. स्वतःला व इतरांना पी़डा देणं, दडपणूक करणं, त्यातून अहंकार जोपासणं याला आपण 'ईश्वरोपासना' समजतो!
मंदिराचा पुजारी हा असलाच कर्मठ मनुष्य होता - स्वतःवर स्त्रीची सावलीदेखील पडू देत नसे. गेली तीस वर्षं त्याने मंदिराच्या आवाराबाहेर पाऊल टाकलं नव्हतं, व कुणाही स्त्रीला मंदिरात पाऊल टाकू दिलं नव्हतं. स्त्रियांनी महाद्वाराबाहेरून गाभाऱ्यातील काळोखाचं दर्शन घ्यावं फक्त.
मीरेबद्दलच्या आख्यायिका पुजारीबुवाच्या कानी आल्या होत्याच. आज ना उद्या ही बया इथे येऊन ठेपेल ही चिंता त्याला अधूनमधून सतावे 
 
मीराबाई आली. भक्तीरसात चिंब. तिचं भजन, तिचं नृत्य इतकं दिव्यमधुर, मत्तसुंदर होतं की ते पाहून द्वारपाल मुग्ध झाले. तिला अडवण्याची शुद्धच राहिली नाही त्यांना
धुंद अवस्थेत मीरा मंदिर-प्रांगणात आली. पूजाअर्चा उरकून पुजारी नुकताच गाभाऱ्याबाहेर पडला होता. मंदिराच्या आवारात तिला गिरक्या घेताना पाहून त्याला धक्का बसला. लाल गुलाबपुष्पांनी भरलेली थाळ त्याच्या हातून खाली पडली. "हे...हे मंदिराच्या नियमांविरुद्ध आहे. तू आत आलीसच कशी? त्यांनी तुला अडवलं नाही??" संतापातच्या भरात कसेबसे शब्द जुळवत पुजारी उद्गारला.

गालातल्या गालात हसत मीराबाई म्हणाली "अरेच्चा! मला वाटत होतं, की कृष्ण हा अनन्य पुरुष आहे; त्याच्यापुढे सारी माणसं स्त्रियाच आहेत - साऱ्या कान्हाच्या प्रेमिका, मुरलीधराच्या गोपिका आहेत. पण तुझं बोलणं ऐकून मी कोड्यात पडलेय: कृष्णाव्यतिरिक्त जगात आणखी कोणी 'पुरुष' आहे की काय? 
चल, आज सांगून टाक तू कोण ते - पुरुष, की स्त्री?"

मीरेच्या बोलण्याचा गर्भितार्थ लक्षात आल्याने पुजारी खजील झाला. त्यानं कबुली दिली: “मी... कृष्णापुढे मीदेखील स्त्रीच आहे.”
 
“छान. आता मंदिराच्या नियमात बदल कर: केवळ ‘स्त्रियां’नाच इथे प्रवेश मिळेल. जे कोणी स्वतःला पुरुष समजतात, त्यांना प्रवेश मिळणार नाही!

 

Comments