माझा परिचय

 माझा परिचय
  मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार'

राजकारण कळत नसलं, तरी सत्तेत असणाऱ्यांची नावं ठाऊक आहेत मला
नि आठवडयाच्या वारांसारखी किंवा महिन्यांच्या नावांसारखी घोकू शकते मी ती, अगदी नेहरूंपासून. 
 
मी भारतीय, दाट सावळी, मलबारमधे जन्मलेली.
तीन भाषा बोलणारी, दोनांत लिहिणारी, एकीत स्वप्नं पाहणारी.
"इंग्लिशमधे लिहू नकोस", ते म्हणाले, "ती मातृभाषा नाही तुझी."
- टीकाकारांनो, मित्रांनो, भेटायला येणाऱ्या भावंडा-बिवंडांनो,
तुम्ही सगळे मला अंमळ एकटं का सोडत नाही?
हव्या त्या भाषेत व्यक्त होऊ दया नं मला. 
मी जी भाषा बोलेन ती माझी होते -
तिचे विपर्यास, तिच्या वेडया कळा…माझं असतं सारं, फक्त माझं.
तिचं धड ना इंग्रजी - धड ना भारतीय असणं विनोदी वाटेल कदाचित, पण ती प्रांजळ असते,
माझ्याइतकीच 'माणसाळलेली' असते - कळत कसं नाही तुम्हाला?
ती असते माझ्या सुखांची, अभिलाषांची, माझ्या आशांची अभिव्यक्ती,
आणि मुख्य म्हणजे तिचा मला उपयोग होतो,
कावळ्याला कावकाव अथवा सिंहाला गर्जना उपयोगी पडावी तसा.
मानवी वाचा असते ती - 'तिथे' नसून 'इथे' असलेल्या, 
बघू-ऐकू शकणाऱ्या, जाणत्या मनाची वाचा.
वादळात सापडलेल्या झाडांची,
पावसाळी ढगांची, 
वा पावसाची
ती बेफिकीर, बधिर बडबड नव्हे,
की धगधगत्या चितेची असंबद्ध पुटपुट नव्हे.
 
मी लहान होते. मग एके दिवशी ते म्हणाले की मी मोठी झालेय -
का, तर माझी उंची वाढली, हातापायांचा आकार वाढला,
शिवाय एक-दोन जागी केस फुटले म्हणून.
दुसरं काय मागावं ते ठाऊक नसल्यानं जेव्हा मी प्रेम मागितलं
तेव्हा त्यानं या सोळा वर्षांच्या पोरीला बेडरूममधे ओढून घेऊन दार लाऊन टाकलं.
त्यानं मारलं नाही मला, तरी माझ्या बिच्चाऱ्या 'बाईच्या देहा'ला पार झोडलं गेल्यागत वाटलं.
माझ्या स्तनांच्या, गर्भाशयाच्या ओझ्याखाली दबली गेले मीच.
स्वतःची कीव वाटून स्वतःला आकसून घेतलं मी.
त्यानंतर मात्र...शर्ट घातला मी, भावाची पँट चढवली,
केस आखूड कापले आणि दुर्लक्षून टाकलं स्वतःचं स्त्रीत्व.
"अगं साडया नेस, जरा मुलीसारखी वाग, बायको हो कुणाची," ते म्हणाले,
"भरतकाम करणारी, स्वयंपाक करणारी, नोकरांशी हुज्जत घालणारी..."
"जुळवून घे की जरा! सामाव कुठेतरी!" वर्गीकरणवादी खेकसले.
"नुसती भिंतींवर बसून राहू नकोस.
आमच्या जाळीदार पडदयांआडच्या खिडक्यांमधून डोकावून पाहू नकोस.
आमी  हो, कमला  हो, किंवा त्याहीपेक्षा बरं म्हणजे सरळ माधवीकुट्टी  हो.
एक नाव, एक भूमिका निवडण्याची वेळ आहे ही. 
नसते बहाणे करू नकोस. भ्रमिष्ट, लंपट असल्यासारखी काय वागतेस?
प्रेमात फसवली गेल्यावर लाज निघेल इतक्या मोठयाने गळा कसला काढतेस?"
 
एक पुरुष भेटला, प्रेम केलं मी त्याच्यावर - 
त्याला कुठल्याच नावाने पुकारू नका. 
ज्याला स्त्री हवी असते असा प्रत्येक पुरुष म्हणजे तो -
जशी प्रेमाच्या शोधात असलेली प्रत्येक स्त्री म्हणजे मी.
त्याच्याठायी...नदयांची व्याकुळ अधीरता.
माझ्याठायी...सागराची उदंड प्रतीक्षा.

"कोण आहेस तू?" मी प्रत्येक अन् प्रत्येकाला विचारते.
उत्तर येतं, "मी 'मी' आहे."
जिथेतिथे, सगळीकडे जो-तो स्वतःला 'मी' म्हणताना दिसतो मला.
या जगात करकचून आवळला गेलाय तो, म्यान केलेल्या तलवारीसारखा.
'मी'च असतो परक्या शहरांतल्या हॉटेल्समधे एकटाच 'घेत' बसणारा;
रात्री बारा-बारा वाजेपर्यंत पिणारा.
'मी' खिदळणारा, 'मी' प्रणयधुंद होणारा नि मग लाजून चूर होणारा.
पापी 'मी', पुण्यात्माही 'मी'च.
'मी'च तो, घशात काही अस्फुट असताना निपचित मरून पडलेला.
ज्याच्यावर प्रेम केलं जातं अन् ज्याची प्रतारणाही होते असा 'मी.'
माझी अशी कुठलीच सुखं नाहीत जी तुमची नसतील,
अशा कुठल्याच व्यथा नाहीत ज्या तुमच्या नसतील -
मीसुद्धा स्वतःला 'मी' म्हणते ना.


 

Comments