मदहोशी

 
 
एके संध्याकाळी अकबर जंगलात शिकारीसाठी गेला होता. नमाज़पठणाची वेळ झाल्याचं परतीच्या वाटेवर त्याच्या लक्षात आलं. घोड्यावरून खाली उतरून, पालापाचोळ्यात सतरंजी अंथरून तो नमाज़ अदा करू लागला. एकाएकी अकबराच्या अंगाला कसलासा धक्का लागला. बेसावध अकबर वज्रासनातून जवळपास कोलमडलाच. नीट पाहीपर्यंत वेगाने धावत जाणारी मानवी आकृती जंगलात गुडूप झाली होती.
अकबराच्या मनात त्या अज्ञात व्यक्तीला शासन घडवण्याची इच्छा उफाळून आली. पण करता काय, नमाज़ पढत असता मध्येच उठून चालत नाही.
नमाज़पठणानंतर अकबर तिथेच खोळंबून राहिला. ...कदाचित तो इसम गेल्या वाटेने परत येईल. 
तो पहा आला! अल्लड युवती होती ती.
 
"ए मुली! थांब जरा," तिची वाट अडवत अकबर गुश्शात म्हणाला. "नमाज़ अदा करणाऱ्या माणसाला तुझा धक्का लागला, तरी तू तशीच पुढे पळून गेलीस. माफी मागणं सोडा, मागे वळून बघितलंदेखील नाहीस. अगं, तुला काही रीतभात? नमाज़पठण करणारी व्यक्ती खुद्द सम्राट अकबर आहेत, हेही तुझ्या लक्षात येऊ नये म्हणजे हद्द झाली! सोम्यागोम्यालाही प्रार्थनेचे वेळी त्रास देऊ नये, तू चक्क सम्राटाला धक्का दिलास. लाज नाही वाटत तुला?"
 
युवती दम लागल्यामुळे धापा टाकत होती. अकबराचं बोलणं संपल्यानंतर ती विनयानं म्हणाली, "माफ करा, सरकार. त्यावेळी कुणालातरी आपला धक्का लागल्याचं आठवतसुद्धा नाही मला. खरंतर... झालंय असं, की खूप खूप दिवसांनी माझा प्रियकर परगावाहून आलाय. त्याच्या येण्याची वार्ता कानी पडताच मी धावत सुटले वेड्यासारखी. मनात फक्त नि फक्त त्याचा विचार होता, त्याला डोळे भरून पाहण्याची उत्कंठा होती.
माझ्या आगळिकीबद्दल तुम्ही मला दंड देऊ इच्छित असाल जरूर द्या. पण मला एक विचारल्याखेरीज रहावत नाही: मी प्रियकराची गळाभेट घ्यायला जात होते, पण तुमची तर साक्षात् परमात्म्याशी भेट होत होती. असं असूनही माझा धक्का तुमच्या लक्षात राहिला? ईश्वराशी चाललेल्या तुमच्या मीलनात माझ्या बापडीच्या धक्क्याने व्यत्यय आला? शिवाय नमाज पुरा होईपर्यंत तुम्ही त्याबद्दलचे विचार मनात घोळवत राहिलात? ही कसली आराधना, मला काही समजत नाही."
 
अकबर वरमून युवतीच्या वाटेतून बाजूला झाला.
 
अकबरानं म्हणे आपल्या चरित्रात उल्लेख करविला आहे: 'त्या युवतीमुळे आपली उपासना दांभिक असल्याची आम्हाला लख्ख जाणीव झाली. प्रियकराच्या ओढीने ती कशी बेभान झाली होती! नि आम्ही परमात्म्याला भेटत होतो - छट्, काय ते भेटणं! नुसते डोळे मिटून बसलो होतो इतकंच.'

Comments