खलबत

चार चोरांनी सावकाराच्या घरावर दरोडा घालून बरंच मोठं घबाड मिळवलं. मुद्देमाल घेऊन चौघेजण वाटणी करण्सासाठी गावाबाहेरील स्मशानात गेले. एकाच्या मनात आलं, एका फटक्यात इतका सारा ऐवज मिळण्याची ही पहिलीच वेळ. हा प्रसंग साजरा केला पाहिजे. मालाला हात लावण्यापूर्वी देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला पाहिजे.
तेव्हा चौघांपैकी दोघांनी सकाळ होताच पुढल्या गावात जाऊन मिठाई आणावी आणि तोवर अन्य दोघांनी झाडाखाली ऐवजाची राखण करत बसावं असं ठरलं. आतापावेतो चौघांचा एकमेकांवर विश्वास होता, पण तासागणिक प्रत्येकाच्या मनात लोभ वाढीस लागला. 

दुसऱ्या दिवशी बाजारात गेल्यानंतर त्या दोघांनी आपापसात खलबत केलं. 'आपण इथेच पोटभर मिठाई खाऊ. मग आणखी मिठाई विकत घेऊन तीत विष कालवू, व ही मिठाई प्रसाद म्हणून त्या दोघांना खाऊ घालू. ते मरतील, आपला हिस्सा वाढेल!'
मालाची राखण करत बसलेले काही कमी नव्हते. त्यांनीही खलबत केलं. 'ते दोघेजण झाडाखाली येताच त्यांची मुंडकी छाटून टाकू. तेवढेच दोन वाटेकरी कमी!'

मिठाई घेऊन आलेल्यांची शिरं तत्काळ धडावेगळी करण्यात आली. 
विषारी मिठाईवर ताव मारल्यानंतर अन्य दोघे गतप्राण होऊन पडले.
 

Comments