'स्वानंदाद्वारे मी परमानंद जाणतो'

च्वांग त्झू  आणि हुइ शी हाओ नदीच्या काठाने चालले होते. 
 
च्वांग त्झू  म्हणाला, "मासोळ्या बघ पाण्यात कशा खेळतायत, सूर मारतायत. यातच त्यांना आनंद आहे."
 
"तुम्ही स्वतः मासा नाही, मग माशांना कशात आनंद आहे ते तुम्हाला कसं ठावूक?" - हुइ शी चा प्रश्न.

"तू म्हणजे मी नाहीस, मग माशांचा आनंद मला ठावूक नाही, हे तुला रे कसं ठावूक?" - च्वांग त्झू.

"बरोब्बर! मी म्हणजे तुम्ही नसल्यामुळे तुम्हाला ते ठावूक आहे की नाही हे जसं मला कळू शकत नाही, तस्संच तुम्ही म्हणजे ती मासोळी नसल्यामुळे तिच्या भावनासुद्धा तुम्हाला कळू शकत नाहीत - मुद्दा स्पष्ट आहे!" - हुइ शी.

"आं, जरा थांब," च्वांग त्झू म्हणाला, "आपण तुझ्या मूळ प्रश्नाकडे परत फिरू. तू विचारलंस, 'माशांना कशात आनंद आहे ते तुम्हाला कसं ठावूक?' म्हणजे मासे आनंदात असल्याचं मला ठावूक आहे, इतकं तुला समजलं होतं. 'कसं काय?' हा खरा प्रश्न होता.
नदीतल्या मासोळ्यांचा आनंद मी जाणतो, कारण त्याच नदीकाठाने चालत असता स्वतःला होणारा आनंद मी जाणतो. स्वानंदाद्वारे मी परमानंद जाणतो." 
 
 
 

Comments