अलेक्झांडर व डायॉजिनिस
सम्राट अलेक्झांडर विश्व पादाक्रांत करण्यासाठी निघाला. वाटेत त्याला
डायॉजिनिस दिसला. हा ग्रीक तत्त्वज्ञ म्हणजे एक वल्लीच होती. अलेक्झांडरला
त्याच्याविषयी कुतुहल वाटे. "आजचा दिवस विश्राम करा," तो सैन्याला उद्देशून
म्हणाला, "आपण इथेच तळ ठोकतोय. मी डायॉजिनिसकडे जाणार आहे. अनेक
वर्षांपासून त्याला पाहण्याची इच्छा होती, कदाचित आज पुरी होईल. येथपासून
जवळच कुठेतरी तो मुक्कामाला आहे असं दिसतं. त्याची भेट घ्यायला फार आवडेल
मला."
अलेक्झांडर डायॉजिनिसचा पत्ता शोधत निघाला. सकाळची वेळ होती. स्वारी
नदीकिनारी ऊन खात पडली होती. फकीरवृत्तीचा डायॉजिनिस नग्नावस्थेत रहायचा
म्हणतात. ...वाळूत पहुडलेल्या त्या नंग्या शरीराचं आगळंच तेज होतं. आगळंच
रुपडं होतं ते. अखंड तृप्ती झळकत होती त्या देहावर.
एक महान सम्राट 'वेडा' म्हणवल्या जाणाऱ्या एका भणंग इसमाचं जगावेगळं सौंदर्य न्याहाळू लागला.
एक महान सम्राट 'वेडा' म्हणवल्या जाणाऱ्या एका भणंग इसमाचं जगावेगळं सौंदर्य न्याहाळू लागला.
अलेक्झांडर म्हणाला, "तुला पाहून मन प्रसन्न झालं. तुझ्यासाठी करण्याजोगं
काही असेल, तुला देण्यायोग्य माझ्यापाशी काही असेल तर अगदी आनंदानं देईन
मी."
"तू जे देशील त्याची मला गरज असणार नाही. तुझ्या भेटवस्तूंचं मला ओझंच
होईल," डायॉजिनिस म्हणाला, "तरीदेखील माझ्यासाठी काही करण्याची तुझी इच्छा
असेल तर सम्राटा, कृपया जरा बाजूला सरक. तू तिथं उभा राहिल्यामुळं माझं ऊन
अडतंय."
त्या शब्दांनी अलेक्झांडर स्तिमित झाला. ...या माणसाला काहीही नकोय. किती समाधानी आहे तो!
"जग जिंकून आल्यानंतर मलासुद्धा तुझ्याप्रमाणं जगायला आवडेल!" निरोप घेता घेता अलेक्झांडर म्हणाला.
"अरे, मग जग जिंकण्याची अट तरी कशाला लादतोस स्वतःवर? मी कुठं जग जिंकलंय?
कुठं पराक्रम गाजवलेत? तरी मजेत आहे की मी. तूही मजेत जगू शकतोस - आज,
आत्ता. हा किनारा बघ, दूरवर पसरलाय. चिकार जागा आहे इथे. ये, आराम कर,
काढून टाक तुझे ते कपडे, जरा ऊब लागू दे अंगाला. काय सुंदर सकाळ आहे पहा!"
"हो, मला खरंच आवडेल असं निवांत जगणं, पण आत्ता नाही. मी जगज्जेता झालो की मग..."
"मग, नंतर, उद्या आराम करणं आजवर कुणालाच शक्य झालेलं नाही. आज, आत्ता केलं
तरच ते शक्य आहे. 'उद्या' कधी उगवतच नाही ना रे. आणि अवघं जग आपल्या मुठीत
घेऊ शकलाय का कुणी? जगज्जेता होईपर्यंत तुझं आयुष्य सरलेलं असेल. अर्ध्या वाटेतच तुझा अंत होईल. तुला शांतता, निवांतता मुळी लाभणार नाही."
Comments
Post a Comment