'दोस्त' (नात्सु नो निवा) - पुस्तक परीक्षण*
मराठी अनुवाद: 'दोस्त' (रोहित अक्षरसाहित्य, २०१५)
अनुवादक: चेतना सरदेशमुख-गोसावी आणि मीना आशिझावा
पृष्ठसंख्या: ११३
जपानी प्राथमिक शाळेच्या एकाच यत्तेत शिकणाऱ्या मित्रांचं त्रिकूट. त्यातल्या एकाची दूरगावी राहणारी आजी वारते. तो अंत्यसंस्काराला जाऊन येतो, दोघा मित्रांशी त्याबाबत सविस्तर बोलतो. मृत्यूचा अनुभव नेमका कसा असेल?? - तिघांच्या मनात जबरदस्त कुतूहल दाटतं. 'शहराच्या जुन्या भागात राहणारा एकाकी म्हातारबुवा कधीही गचकू शकतो' असं योगायोगाने ऐकिवात आल्यावर तिघे बहाद्दर चक्क त्याच्यावर पाळत ठेवू लागतात! या हेरगिरीचं पुढे काय होतं?... म्हातारबुवाचं काय होतं?...
लहान मुलांकरता लिहिणं म्हणजे आंजारागोंजारी करणं, 'तात्पर्या'ची घुटी पाजणं, आपले धार्मिक-नैतिक-राजकीय-सामाजिक-कलात्मक मताग्रह मुलांच्या गळी उतरवणं असं चित्र बव्हंशी दिसून येतं. तथापि जगभरातील काही प्रतिभावान लेखक हे वाढत्या वयाच्या व्यक्ती प्रौढांइतक्याच विचारक्षम, संवेदनक्षम असल्याचं मानतात आणि मृत्यू, लैंगिकता, हिंसा, नात्यांमधले तणाव, निसर्गविनाश, श्रद्धा-अश्रद्धा इ. 'मोठ्यांच्या गप्पां'मधले विषय लहानांकडे मोठ्या विश्वासानं सोपवतात. त्याकरता हे कलाकार शैलीच्या पातळीवर विशेष कष्टदेखील घेतात. अशा कलाकृतींकडे, साहित्याकडे, लेखकांकडे रसिकांचं लक्ष वळवण्याची आवश्यकता भासत असल्यामुळे वर्गीकरणात्मक शिक्क्यांना महत्त्व देत नसूनदेखील 'बालसाहित्य', 'कुमारसाहित्य' वगैरे शब्द मी इथे वापरणार आहे.
'नात्सु नो निवा' - युमोतो काझुमी या समकालीन जपानी लेखिकेच्या कारकिर्दीतील ही पहिलीच कादंबरी लहानथोरांवर विश्वास टाकणारी, त्यांना प्रश्नांच्या गुंत्यात गुंतू देणारी, गुंते सोडवण्याचा अवकाश देणारी उत्कृष्ट कुमारसाहित्य-कृती आहे असं खचितच म्हणता येईल. मराठीभाषक म्हणून तीबद्दल अधिक सुखावण्याचं कारणं म्हणजे चेतना सरदेशमुख-गोसावी आणि मीना आशिझावा या द्वयीनं कादंबरीचा 'दोस्त' नावे केलेला मराठी अनुवादही उत्कृष्टच झाला आहे.
स्वतः भाषांतर करत असल्याने भाषांतरित/अनुवादित साहित्य वाचताना माझा 'तो डोळा' टक्क जागा असतो. वरवर चांगल्या वाटणाऱ्या अनुवादांतही सूक्ष्म निरीक्षणाअंती पौष्टिक व निःसत्व असा भेद जाणवतो. 'पौष्टिक' अनुवाद हे मुळातील चांगल्या लेखनाबरोबरच चांगल्या अनुवादाचा प्रत्यय वाचकाला देतात; त्याच्या भाषाव्यवहार-विषयक, अनुवादकला-विषयक जाणीवेला धार आणतात. 'निःसत्व' अनुवादाने पोट भरेल, पण पोषण होणार नाही. 'दोस्त' नामक अनुवादित कादंबरीच्या पैष्टिकतेकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे.
चेतना सरदेशमुख-गोसावी यांनी काही दशकांपूर्वी 'तोत्तोचान' या जपानी कादंबरीच्या थेट अनुवादातून शिकण्याचा व जगण्याचा प्रगल्भसुंदर अनुभव मराठी वाचकांपर्यंत पहोचवल्याचं आपल्याला ज्ञात असेलच.
तर मीना आशिझावा प्रदीर्घ काळापासून जपानी भाषेचं अध्ययन- अध्यापन करतात.
दोघींशी झालेल्या बातचितीमधून अगदी सहज, तरीही विचारपूर्वक घडलेल्या या अनुवादातील काही खुब्या जाणून घेण्याची मला संधी मिळाली.
अनुवाद प्रकाशित करायचा अशी कोणतीही प्रारंभिक योजना नव्हती. निव्वळ स्वानंदाखातर हे काम सुरु झालं. साधारणतः ११३ पानी कादंबरीच्या अनुवादाला लागावा त्याहून पुष्कळच जास्त काळ दोघी अनुवादिका कादंबरीवर काम करत होत्या. त्यामागे बरीच कारणं असली तरी एवढा वेळ नियमित विचारमंथन, चर्चा करत राहिल्याचा अनुवादप्रक्रियेस लाभ झाला (अनुवादाच्या एकात्म रूपातून ते जाणवतंच). एकाहून अधिक व्यक्ती एकत्रितपणे अनुवाद करणार म्हणजे भलताच पेचप्रसंग. प्रत्येकाचं आकलन भिन्न, शब्दांची निवड भिन्न, अनुवादविषयक भूमिका भिन्न. तथापि कादंबरीच्या अनुवादाची संपूर्ण प्रक्रिया एकसाथ बसून, नित्यसंवादातून पार पाडल्यामुळे अनुवादात कुठेही विसंगतींचा लवलेश नाही.
अनुवादकीय स्वातंत्र्याचा विचक्षण निडरपणे वापर केल्याखेरीज; अनुवादकाने आपल्या स्वयंभू अन्वयांच्या पायावर अनुवादाची इमारत उभी करण्याचं आह्वान पेलल्याखेरीज अनुवाद चैतन्यमय होणारच नाही. नवे वेष चढवल्याखेरीज मूळ कृती देशोदेशी प्रवास करू शकणार नाही. अनुवादित कृतीत अनुवादक अदृष्य नसतो, नसावा असा म्हणूनच उत्तर-आधुनिक तज्ञांचा आग्रह आहे.
'दोस्त'च्या अनुवादिकांनी हे स्वातंत्र्य मनसोक्तपणे घेतलं आहे, सूज्ञपणे वापरलं आहे. मुद्रित अनुवादासंबंधीच्या कित्येक रूढ वाटा त्यांनी चालताचालता सहज बदलल्या आहेत.
'नात्सु नो निवा' या जपानी शीर्षकाचा शब्दशः अर्थ आहे उन्हाळी बगिचा. 'उन्हाळ्यातील बगिचा' ही संकल्पनाच मराठी पर्यावरणात अस्तित्वात नाही. त्यामुळे अनुवादिकांनी एकंदर आशयाला धरून कादंबरीचं 'दोस्त' असं समर्पक पुनर्नामकरण केलं आहे (इंग्रजी अनुवादातसुद्धा हा बदल केला गेल्याचं आढळलं). संपूर्ण पुस्तकातील मराठी ओघवती, आजची, त्या-त्या पात्राच्या वयाला साजेशी असली तरी आजच्या मराठी बोलीला जडलेली व्यंगं तिच्यात आढळत नाहीत. बोलीतील काही उद्गार-उच्चार जसेच्या तसे उतरवल्याने वाचताना, विशेषतः जाहीर वाचन करताना वेगळी रंगत येते. 'पुस्तक मोठ्याने वाचून दाखवण्याच्या पद्धतीसंदर्भात अनुवादप्रक्रियेत खास विचार व्हावा' अशी अपेक्षा बालसाहित्याच्या भाषांतरांचे अभ्यासक व्यक्त करतात, ते काही उगाच नव्हे. 'दोस्त'मधील अनुवादाकीय बारकाव्यांची काही उदाहरणं पाहू:
मज्जाबिज्जा काई नाई. (०५)
पुढल्यावेळी येताना जरा 'बरे' मित्र घरी घेऊन ये. (१३)
पाऊस थोडा ओसरला होता पण झोपी जाण्यापूर्वी बाळ जसं थांबून थांबून रडतं तसा थांबून थांबून पडत होता. (७५)
त्या बाईंनी एकदम आवाज खाली आणून विचारलं, काहीतरी गुपित आहे का त्यांचं? हे फारच झालं होतं. (८०)
आज्जीचा मित्लं?... आज्जीलापण मित्लं असतात? (८१)
दैनंदिन मराठीत रुळलेले इंग्रजी शब्द चपखल जागी येतात, काना-डोळ्याला खटकत नाहीत. 'टॉयलेट', 'सॉरी', 'लकी', 'फॅन्स'सारख्या शब्दांचं भाषांतर केलं असतं तर संवादांची 'लिंक' तुटली असती, नाही का? 'डिटेक्टिव्ह', 'फिल्मस्टार'चे मराठी पर्याय वापरले असते तर त्या वर्णनांमधली रोमांचकता काहीशी उणावली असती.

'दोस्त'मधील मराठी प्रौढ वाचकाला बाळबोध वाटत नाही, आणि मला खात्री आहे की मराठीतून वाचन करणाऱ्या कोणाही मुलाला ती दुर्बोध वाटणार नाही. हा सुवर्णमध्य कसा साधलात, असं विचारल्यावर दोघी अनुवादिका हसून म्हणाल्या, की तीन मुलांची ही गोष्ट आम्ही गप्पांच्या ओघात एखाद्याला जशी ऐकवली असती तसाच हसतखेळत अनुवाद केला.
मूळ कांदबरीतील काही सांस्कृतिकदृष्ट्या अतिअनाकलनीय, परके संदर्भ अनुवादात वगळल्याचं अनुवादिका म्हणाल्या, ते संदर्भ नेमके कोणते हे कळू शकलं नाही. मात्र 'सेन्सॉरशिप' करून तथाकथित 'आक्षेपार्ह' मजकूर वगळण्याचा भोचकपणा कुठेही केलेला नाही हेदेखील त्यांनी अधोरेखित केलं (वाचकाला या इमानदारीचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही).
मूळ जपानी कादंबरीत रेखाटनं अंतर्भूत नसून मराठी अनुवादात पूजाताईंनी मोजकीच, लहान मुलाने काढल्याप्रमाणे वाटतील अशी ओबडधोबड चित्रं काढली आहेत. त्यांतील काही प्रसंग मनावर ठसतात.
'दोस्त'मधील मला खटकलेली गोष्ट म्हणजे रेणूताई गावस्कर यांनी पुस्तकाला दिलेली प्रस्तावना – फार गुळमुळीत वाटली. कादंबरीच्या परिचयाबरोबरच लेखिका युमोतो काझुमी यांच्यासंबंधी, सध्याच्या जपानी बालसाहित्यासंबंधी प्रस्तावनेत चार शब्द वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती - जी मला अवाजवी वाटत नाही - पण तिचा पुष्कळ भाग कथानक सांगण्यात खर्ची पडला आहे.
असो. 'नात्सु नो निवा' ऊर्फ 'दोस्त' नामक संपन्न लेखकीय व अनुवादकीय जाणिवांच्या फुलबागेत आपण जरूर हरवून जावं.

*'केल्याने भाषांतर' या त्रैमासिकात (ऑक्टोबर-डिसेंबर २०१७) हे पुस्तक परीक्षण प्रकाशित झालं होतं.
Comments
Post a Comment