मनाची मिरवणूक
स्वामी शरणानंदजी रांचीत असताना एक वकील त्यांच्या भेटीस आले. याच सुमारास गांधीजी त्या वकील महोदयांच्या घरी उतरले होते. शरणानंदांसमोर जाताच वकील म्हणाले, "स्वामीजी, काही केल्या मन मरत नाही. ज्याच्या फटकाऱ्यांनी मन खलास होईल असा एखादा चाबूक सांगा." शरणानंद म्हणाले, "काय वकीलसाहेब, गांधीजींचे यजमान असून मरण्या-मारण्याची भाषा करता! मनाला बळपूर्वक नाहीसं करण्याचा जितका प्रयत्न कराल तितकं ते प्रबळ होईल. आपल्याच संकल्पातून सत्ता मिळवून मन आपल्यावर राज्य गाजवतं. असहकार, असहयोग हे गांधीजींचं अमोघ अस्त्र आहे ना? - मनासोबत असहयोग करा. मनाची मिरवणूक पाहत रहा, तिच्यात सामील होऊ नका. मजा येईल. ..त्याचं काय आहे, तुम्हाला हवी असते क्रांती, आणि तुम्ही करता आंदोलन." "आंदोलनातूनच तर क्रांती घडते ना?" वकीलसाहेबांनी विचारलं. शरणानंद म्हणाले, "नाही. आंदोलन म्हणजे आपल्या मागण्या बळपूर्वक इतरांकडून कबूल करवून घेणं. क्रांती म्हणजे हर्षपूर्वक तप करून स्वतःला बदलणं. दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्याबाबत आग्रही नसणं. तुम्ही करता आंदोलन, तुम्हाला आस मात्र क्रांतीची असते. तुम्ही स्वतः बदलत...